पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्पालगतचा भूखंड शिवजयंती व अन्य कार्यक्रमांसाठी मिळावा, यासाठी पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आणि खासदार श्रीरंग बारणे यांना भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीने गुरुवारी (दि.१९) साकडे घातले.

पिंपरी येथील महापालिका भवनात याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, आयुक्त शेखर सिंह यांची खासदार बारणे यांच्या मध्यस्थीने समिती शिष्टमंडळाने भेट घेतली. माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी अण्णा कसबे, धनाजी यळकर, सतिश काळे, वैभव जाधव, ब्रह्मानंद जाधव, सचिन पवार आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव, त्याचप्रमाणे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा दरवर्षी येणारा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या विसाव्यासाठी ही जागा महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे, निगडीतील ग्रामदैवतेचा जत्रा उत्सव आणि लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान म्हणून या जागेचा वापर होऊ शकतो, अशी भूमिका भापकर यांनी मांडली.
पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी निगडीतील जागेबाबतचा अहवाल नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवावा, अशी मागणी भापकर यांनी केली. भक्ती-शक्ती उद्यानाजवळील भूखंड ज्या विकसकांना दिला आहे. त्यांना दुसरी एखादी पर्यायी जागा द्यावी. हा भूखंड शिवकार्यासाठीच राहावा, याबाबत आपण सकारात्मक भूमिका घ्यावी, असे बारणे यांनी महिवाल यांना सांगितले. तसेच मी याविषयी मुख्यमंत्र्याशी स्वतः बोलतो असे त्यांनी स्पष्ट केले. पीएमआरडीएने निगडीमध्ये विकसकांना दिलेल्या भूखंडावर पोलीस बंदोबस्तात काम सुरू होण्याची भीतीही भापकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली नाही..
भापकर म्हणाले की, निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पालगतच्या जागेबाबत मंगळवारी (दि.१७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समेवत मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक ठरली होती. तथापि, चार तासांच्या प्रतीक्षेनंतरही ही बैठक होऊ शकली नाही.






















Join Our Whatsapp Group