पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात शनिवारी (दि.९) ६६३ जणांचे दावे निकाली काढण्यात आले. त्या माध्यमातून एकूण २ कोटी २९ लाख ५९ हजार ८०० रुपयांचा महसुल जमा झाला.
नेहरूनगर येथील न्यायालयात घेतलेल्या लोकन्यायालयात विविध प्रकारचे ३२९ दावे निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ४७ हजार ८०० रुपये इतका महसूल जमा झाला. तर, आकुर्डी येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयामध्ये पाणीपट्टी आणि मिळकत कराची एकूण ३३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या माध्यमातून २ कोटी २९ लाख १२ हजार रुपयांचा महसूल जमा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पिंपरी-नेहरुनगर येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे, एन. आर. गजभिये तसेच पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
लोकन्यायालयात जास्तीत जास्त खटले निकाली निघावे, यासाठी अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुदाम साने, अॅड. संगीता परब यांनी उपस्थित नागरिक व खटल्याचे काम पाहणाऱ्या वकील बंधू- भगिनींनी समजुतीने ही सर्व प्रकरणे निकाली निघावे, या दृष्टीने आवाहन केले. लोकन्यायालयात अॅड. आस्मा मुजावर, अॅड. वैष्णवी काकडे, अॅड. संघर्ष सुर्यवंशी यांनी पॅनल जज म्हणुन भाग घेतला.
अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आकुर्डी न्यायालयातील न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांची भेट घेऊन कामकाजाबद्दल माहिती घेतली. तसेच तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेल्या महिलांना उपस्थित न्यायाधीश, अॅडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या महिला सचिव अॅड. मोनिका सचवाणी, सह-सचिव अॅड. उमेश खंदारे, खजिनदार अॅड. अजित खराडे, अॅड. संदीप तापकीर, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. सारिका परदेशी, अॅड. विवेक राऊत, अॅड. वैभव कल्याणकर, अॅड. अजिंक्य लोमटे, अॅड. शंकर घंगाळे आदी उपस्थित होते. सचिव अॅड. धनंजय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खिलारी यांनी आभार मानले.























Join Our Whatsapp Group