पुणे (Pclive7.com):- पुणे शहराच्या उच्चभ्रू परिसरात चालणारा आणि विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने चालविला जाणाऱ्या बेकायदा वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विमाननगरमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये केलेल्या कारवाईत चक्क एक अभिनेत्री वेश्या व्यवसाय करीत असताना आढळून आली. तिच्यासह उझबेकिस्तान येथील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील काही दिवसांत पुण्यात चालणाऱ्या बेकायदा वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
याप्रकरणी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रोहित (पूर्ण नाव पत्ता महित नाही) या दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये विमाननगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. विमानगर भागातील निको गार्डन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बेकायदा वेश्या व्यवसाय चालविला जात असून याठिकाणी परदेशी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठविले. या ग्राहकामार्फत खात्री केल्यानंतर याठिकाणी पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. यावेळी दोन खोल्यांमध्ये या तरुणींना ठेवण्यात आलेले होते.
यामध्ये उझबेकिस्तानच्या दोन आणि राजस्थानच्या एका तरुणीचा समावेश आहे. राजस्थानची तरुणी स्थानिक पातळीवर अभिनेत्री म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दलाल म्हणून काम करणारे आरोपी इरफान आणि रोहित परराज्यातील तरुण वेश्या व्यवसायाचे हे रॅकेट ऑनलाइन पद्धतीने चालवीत असल्याचे समोर आले आहे.