पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज (दि.०४) पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदन देत एका महत्त्वाच्या विषयावर त्यांचे लक्ष वेधले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत कल्याणकारी योजनेचा एक भाग म्हणून १०वी आणि १२वी इयत्तेत ८०% ते ९०% आणि ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम देण्यात येते. दरवर्षी प्रमाणे पालिकेमार्फत ही योजना राबविण्यात आली आणि ३० सप्टेंबर या अंतिम मुदत पर्यन्त लाभार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. परंतु असे निदर्शनास आली की या योजनेची अंतिम मुदत संपून देखील शहरात अनेक विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत.
महापालिकेच्या कल्याणकारी या योजनेचा मूळ उद्देश विद्यार्थी / विद्यार्थिनींना प्रोत्साहन देऊन त्यांचे पुढील भविष्य बळकट करणे तसेच जनसामान्यांना आपल्या योजनेच्या माध्यमातून त्यांचे कल्याण करणे असून महापालिकेनी त्याविषयी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विद्यार्थी / विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम देण्याबाबत राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनेला आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावे अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कडे केली आहे.