पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना गेल्या कित्येक दिवसांपासून भटक्या,मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाआड कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. शहरात विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव चालू असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
बच्छाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरातील कुत्र्यांची संख्या वाढत असून भटक्या कुत्र्यांनी नागरीकांना चावा घेतल्याच्या घटना शहरात दिवसें-दिवस वाढल्याचे आढळून येत आहेत. शहरात प्रचंड दहशत या कुत्र्यांनी माजवली असून, महापालिकेकडून लवकरात-लवकर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाय-योजना राबविण्यात येणे गरजेचे आहे. शहरातील विविध ठिकाणच्या तक्रारी येऊन देखिल महापालिका प्रशासनाला “भटक्या कुत्र्यांचा त्रास” हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही का ?
शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एकीकडे गंभीर होत असताना, हा प्रश्न सोडविण्यासाठी मनपाकडून ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता त्यांचे निर्बीजीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
दररोज कुठल्या ना कुठल्या तरी भागात या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे शासकीय रुग्णालय व मनपा दवाखान्यातील नोंदीवरून दिसते. यामध्ये लहान मुलांचे लचके कुत्र्यांनी तोडल्याच्या घटना जास्त आहेत. त्यामुळे लहान मुलांना कायमचे अपंगत्व आल्याच्याही घटना आहेत. काही मुलांचा मृत्यूही झाला आहे. या कुत्र्यांच्याबाबतीत नागरिक महापालिकेकडे तक्रार करतात, पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांकडून जास्त दबाव आला की काही कुत्री पकडली जातात. ती बाहेर सोडली, असे त्या कर्मचार्यांकडून सांगितले जाते. पण पकडलेल्या भागात तीच कुत्री पुन्हा दिसतात. भटक्या कुत्र्यांचा विषय अतिशय संवेदनशील आहे. हि गंभीर समस्या मार्गी लागण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group