पिंपरी (Pclive7.com):- पिटा, मोका आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतून शिक्षा भोगून बाहेर आलेली कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिला अमली पदार्थ विरोधी पथकाने आंध्र प्रदेश येथून अटक करण्यात आली. मागील महिन्यात कल्याणीच्या दुकानावर छापा मारून २० किलो गांजा जप्त केला होता. या गुन्ह्यात पूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. तर गांजा विक्रीचे रॅकेट चालवणारी मास्टरमाइंड कल्याणी पळून गेली होती. तिचा शोध घेत पोलिसांनी तिला आंध्र प्रदेश मधील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थ विरोध पथकाने २४ मे २०२५ रोजी पाषाण-सुस रोडवरील कल्याणी देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन या दुकानावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये ११ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा २०.७३६ किलो गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई मध्ये पोलिसांनी कल्याणीचा पती उमेश सुर्यकांत देशपांडे (५६, पाषाण), चुलत जावई अभिषेक विकास रानवडे (३२, पाषाण, मूळ रा. शनिवार पेठ, पुणे) आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे (२२, शनिवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली होती. तर कल्याणी देशपांडे ही पळून गेली होती.
कल्याणी देशपांडे हिला अटक करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले. पथकाने स्थानिक खबरी आणि तांत्रिक विश्लेषणावरून कल्याणीचा शोध घेतला. कल्याणी आंध्र प्रदेश येथील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला आंध्र प्रदेश येथे जाऊन तिला अटक केली.
कल्याणी देशपांडे ही सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी ती वेश्याव्यवसाय चालवण्यात सक्रीय होती. अनेक पोलिस आधिकाऱ्यांना न जुमानता तिने वेश्याव्यवसाय चालवला होता. तिच्यावर डेक्कन, कोथरूड, चतुःश्रृंगी, हवेली आदी पोलीस ठाण्यांमध्ये खून, पिटा अॅक्ट, मोका आणि फसवणूक आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, गणेश कर्पे यांच्या पथकाने केली.