
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला स्थापनेनंतर तब्बल सात वर्षांनी स्वतःचा स्वतंत्र घटक झेंडा मिळाला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पाठपुराव्यामुळे १० नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाने या झेंड्याला अधिकृत मान्यता दिली.

महाराष्ट्र पोलिस दलातील प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयाला स्वतंत्र घटक झेंडा दिला जातो. या झेंड्याचा उपयोग महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळावा, राज्यस्तरीय स्पर्धा आणि इतर अधिकृत कार्यक्रमांमध्ये संबंधित घटकाच्या ओळख आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून केला जातो.

७ वर्षांनंतर पूर्ण झाली प्रतीक्षा..
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली होती. मात्र, स्थापनेनंतरही या आयुक्तालयाला घटक झेंडा उपलब्ध झाला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटक झेंड्याचे रेखाचित्र तयार करून ते महाराष्ट्र पोलिस महासंचालक (DGP) कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केले होते. दरम्यान, पोलिस महासंचालक कार्यालयाने चौबे यांच्या प्रस्तावास मंजुरी देत १० नोव्हेंबर २०२५ रोजी या झेंड्याला अधिकृत मान्यता दिली. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला स्वतंत्र ओळख आणि सन्मान प्राप्त झाला आहे.























Join Our Whatsapp Group