पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा संगीतकार आणि गायकास प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली .
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावे आशा भोसले पुरस्कार दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘पुरस्काराचे यंदाचे सोळावे वर्ष असून हा पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायसक अनु मलिक, शंकर महादेवन,शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोळावा पुरस्कार सुप्रसिध्द गायक पद्मभूषण उदीत नारायण यांना जाहीर करताना परिषदेला आनंद होत आहे. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्हअसे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उदीत नारायण यांनी ३२ भाषांत अठरा हजार गाणी गायली असून लतातदीदी बरोबर २०० गाणी तर आशातार्इंबरोबर चारशेहून अधिकगाणी गायली आहेत.
यंदाचा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक. ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी पुरस्काराचे वितरण माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार असून, जेष्ठ संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता दत्ता साने आदी उपस्थित राहणार आहे.
यावेळी उदीत नारायण यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत ‘रजनीगंधा’ तसेच वैशाली पळसुले सादर ‘फ्युजन नृत्य’ हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य सादर होईल. तरी सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले.






















Join Our Whatsapp Group