पिंपरी (Pclive7.com):- पुण्याच्या धर्ती पिंपरी चिंचवड शहरात फिरते ‘प्रसुती व्हॅन’ सुरू करण्याची मागणी ‘फ’ प्रभाग अध्यक्षा नगरसेविका कमल घोलप यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर उपस्थित होत्या.
नगरसेविका कमल घोलप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, पुणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी सुसज्ज प्रसुती व्हॅन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील लवकरात लवकर फिरते प्रसुती गृह व्हॅन नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी. पिंपरी चिंचवड शहरातील सध्याची वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न मोठी गंभीर झालेला आहे. त्यामुळे महिलांसाठी फिरत्या प्रसुती व्हॅनची नितांत गरज आहे. शहरात वाहतुक कोंडीमुळे गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये पोहोचणे मोठे जिकीरीचे झाले असून हॉस्पिटलमध्ये पोहचण्यास उशीर होतो. रिक्षा, बस, गाडीमध्ये महिलांची प्रसुती झाल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळेच पिंपरी चिंचवड महापालिकेन पुण्याच्या धर्तीवर शहरातील महिलांसाठी प्रसुती व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घ्यावी अशी मागणी कमल घोलप यांनी केली आहे.