पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूलाचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सुरू आहे. या पूलाची अगदी हुबेहूब प्रतिकृती आकुर्डीतील अभिषेक दाणी या तरूणाने घरीच्या गणपती बाप्पा समोर साकारली आहे. ही सजावट संपूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून केली आहे. विशेष म्हणजे बाप्पाची मुर्ती देखील शाडू मातीने बनवलेली आहे. अभिषेक याने केलेल्या या सजावटीचे महापालिकेच्यावतीने कौतुक करण्यात आले. बीआरटीचे प्रवक्ते उपअभियंता विजय भोजने यांनी अभिषेक याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान केला.
यावेळी कनिष्ठ अभियंता दिपक पाटील, सुनिल पवार, बाळासाहेब शेटे, अरविंद माळी तसेच पूलाचे काम करणाऱ्या बी.जी.शिर्के कंपनीचे निवासी अभियंता अनिल बर्गे उपस्थित होते. अभिषेक दाणी याने घरच्या बाप्पासमोर केलेल्या या सजावटीचे वृत्त Pclive7.com ने प्रसिध्द केले होते. त्याचीच दखल घेत महापालिकेच्यावतीने आज त्याचा सन्मान करण्यात आला. अभिषेक याने पर्यावरणपूरक केलेल्या या देखाव्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
विजय भोजने म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. शहराच्या वैभवात भर टाकणारा हा पूल ठरणार आहे. शहराचा मानबिंदू ठरणाऱ्या या पूलाची हुबेहुब प्रतिकृती अभिषेक याने घरच्या गणपती समोर उभी केली आहे. पर्यावरणपूरक पध्दतीने त्याने ही सजावट केली असून शहरवासियांसमोर पुलाचे प्रतिकृती मांडली आहे. म्हणूनच त्याने केलेल्या या सजावटीबद्दल महापालिकेच्यावतीने त्याच्या घरी जाऊन आम्ही सन्मान केला आहे.
आकुर्डी येथील कीर्ती कूपर सोसायटी, सेक्टर नंबर २८, ब्लॉक नंबर २७, येथे दाणी कुटूंबिय राहतात. गेल्या कित्तेक वर्षापासून परंपरेनुसार गणपती बाप्पा या कुटूंबियांच्या घरी विराजमान होतात. याच कुटूंबातील अभिषेक दाणी दरवर्षी बाप्पासमोर वेगवेगळी सुंदर सजावट करतात. यंदाच्या वर्षी देखील त्यांनी भक्ती शक्ती उड्डाणपूलाची प्रतिकृती बनवली आहे. जुन्या बॉक्सचे पुठ्ठे, वर्तमान पत्र, चित्रकलेचा कागद, आणि रंग यापासून अतिशय सुंदर असा देखावा केला आहे. अभिषेक यांनी केलेी ही सजावट आणि बाप्पा पाहण्यासाठी नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक आवर्जून येत आहेत. अभिषेक यांनी पर्यावरणपूरक पध्दतीने केलेल्या या सजावटीचे सर्वजण कौतुक करत आहेत.






















Join Our Whatsapp Group