पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील उड्डाणपुलाखालील परिसर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीला ५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. झोलो स्टेज् पी.जी. असे या संस्थेचे नाव असून उड्डाणपुलाच्या पिलरला बेकायदेशीरपणे जाहिरातीचे स्टिकर लावल्याप्रकरणी महापालिकेने ही कारवाई केली आहे. थेरगाव येथील थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या जागृकतेमुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रभाग क्रमांक १४ थेरगाव येथील गणेशनगर, डांगे चौक येथील उड्डाणपुलाच्या पिलरला झोलो स्टेज् पी.जी. नावाने स्टिकर चिटकविण्यात आले होते. महापालिकेच्या नियमानुसार अशाप्रकारे बेकायदेशीरपणे शहर विद्रुपीकरण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येती. परंतू महापालिकेच्या नियमांचे सर्रासपणे भंग करून या संस्थेने शहर विद्रुपीकरण केले होते. हा सर्वप्रकार थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानुसार आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक एस.बी.चंनाल आणि अरुण राऊत यांनी संबंधित संस्थाचालकाला बोलवून घेऊन ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला.
गेल्या काही वर्षापूर्वी स्वच्छ आणि निटनेटके शहर म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिले जात होते. त्याकरिता स्वच्छ शहर, बेस्ट सिटी सारखे पुरस्कार देखील शहराला मिळाले होते. मात्र आता चित्र बदलत चालले आहे. महापालिका प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता वाढत चालली असून अनाधिकृत होर्डिंग तसेच स्टिकर राजरोसपणे लावले जात आहेत. त्यामुळेच शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. दरम्यान थेरगाव सोशल फाऊंडेशन सारख्या काही मोजक्या संस्था सामाजिक भान ठेवून शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करत आहेत. अशा संस्थांचा आदर्श सर्वांनीच घेण्याची गरज आहे.






















Join Our Whatsapp Group