पिंपरी (Pclive7.com):- प्रत्येक कामगार संघटनेचा चेहरा वेगळा असू शकतो. मात्र कामगार हितासाठी सर्व कामगार संघटनांनी किमान कार्यक्रमावर एकत्र यायला हरकत नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले. नवीन श्रमसंहितेत काही कायदे लोककल्याणकारी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याची टिप्पणी त्यांनी केली. नवीन कामगार कायद्यांमध्ये चांगले कोणते आणि वाईट कोणते? यावर चिंतन करण्यासाठी अभ्यास वर्ग घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने रोटरी क्लब हॉल संभाजीनगर चिंचवड येथे ‘कामगार क्षेत्र काल आज आणि उद्या ‘या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. या चर्चासत्रात कामगार नेतृत्वाची भूमिका या विषयावर ज्येष्ठ नेते मानव कांबळे, महाराष्ट्र मजदूर संघाचे अध्यक्ष इरफान सय्यद, कामगार नेते सचिन लांडगे, महाराष्ट्र मजदूर संघाचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी तर कामगार क्षेत्राबाबत माध्यम प्रतिनिधींची भूमिका या विषयावर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, जयंत जाधव,जयंत शिंदे यांनी मते मांडली. तर कामगार व्यवस्थापन समन्वय या विषयावर राजेंद्र घावटे यांनी मत मांडले. कार्यक्रमाचे आयोजन कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले होते. या कार्यक्रमात कामगार नेते भरत शिंदे यांना कामगार रत्न तर ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव यांना कामगार मित्र पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी सबनीस म्हणाले की, ज्या काळात कामगार नेते मालकांशी सौदेबाजी करतात अशा काळात संघटित कौशल्य आणि शिस्त अंगी बाळगत काशिनाथ नखाते यांच्यासारखा कार्यकर्ता काम करत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. कामगार नेत्याला कामगार चळवळीचा इतिहास माहीत असणे गरजेचे आहे त्याला तो माहीत नसेल तर तो भविष्याचा वेध काय घेणार असा सवाल सबनीस यांनी केला. कामगार चळवळीत पक्ष आणि संघटना असे चित्र दिसत आहे. मात्र कामगारांच्या हिताचा व सत्याचा पक्ष असावा. आपली आयडॉलॉजी सुसंगत असेल तर कामगारांना निश्चितपणे न्याय देता येईल असे ते म्हणाले. काशिनाथ नखाते हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यांनी तसे केल्यास मी पिंपरी चिंचवड मध्ये त्यांच्या विरोधात निषेध सभा घेईन असा टोला डॉ. सबनीस यांनी हाणला.

परिसंवादात बोलताना मानव कांबळे यांनी पिंपरी चिंचवड मधील कामगार चळवळीवर भाष्य केले.कामगार नेत्यांच्या हाय फाय राहणीमानावर बोचरी टीका केली. हल्ली कंपन्यांचे करार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होत आहेत. कामगार नेते महागड्या गाड्यांमधून फिरत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली.

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी कामगार चळवळीचा इतिहास सांगत असताना 1980 नंतर मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर कामगार चळवळ कमकुवत झाली. त्यातच जागतिकीकरण व कंत्राटी पद्धतीमुळे कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे. संघर्ष करायला जावे तर मिळत असलेली अर्धी भाकरी ही गमवायला लागायची या भीतीने कामगारांना ग्रासले आहे फारसा संघर्ष न करता मिळेल ते पदरात पाडून घेण्याची मानसिकता वाढल्याने कामगार संघटनांपुढे आव्हान वाढले आहे. बाहेरचे नेतृत्व एका उद्योगात अनेक संघटना राजकीय पक्षांशी अंकित संघटना, नवीन कामगार संहिता यामुळे कामगार चळवळी पुढे मोठे आव्हान उभे आहे. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे काही नोकऱ्या कमी होणार आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन काम वाढेल ग्रीन एनर्जी आणि पर्यावरण पूरक उद्योगांमध्ये रोजगार वाढेल स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामगारांना अपडेट राहावे लागणार आहे. असे सातुर्डेकर यांनी सांगितले भविष्यात असंघटित कामगारांची संख्या वाढणार आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार संघटनांना काम करावे लागेल असे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्यासोबतच सिद्धनाथ देशमुख, युवराज निलवर्ण, राजेश माने, तुषार घाटुळे, अनिल बारवकर, इरफान चौधरी, लाला राठोड, बालाजी लोखंडे, सहदेव होनमाने, सुनील भोसले, सखाराम केदार आदींनी परिश्रम घेतले.




















Join Our Whatsapp Group