पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कठोर भूमिका घेतली असून, शहरातील अवैध हातभट्टी व दारू विक्रीच्या अड्ड्यांवर बुलडोझर चालवून ते उद्ध्वस्त करण्याचे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी दिले आहेत.

विषारी दारूच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची महापौर रवी लांडगे, आमदार उमा खापरे आणि सदाशिव खाडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्यात आला.

या घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच शहरातील अवैध दारू विक्री, हातभट्टी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी दिला.

शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध व्यवसायांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अशा अड्ड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group