पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील रामनगर परिसरातील मोबाईल दुकानात घुसून कोयत्याचा धाक दाखवत खंडणीची मागणी करणाऱ्या दोन तरुणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी व मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अजय भगवान पवार (वय ३२, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी कल्ल्या ऊर्फ सूरज राजू जाधव (वय २७) व डीजे ऊर्फ रोहित हणुमंत मांजरेकर (वय २०, दोघेही रा. रामनगर, चिंचवड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रामनगर, चिंचवड येथील बालाजी मोबाईल व बालाजी स्टोअर्स दुकानात आरोपींनी प्रवेश केला. त्यांनी दुकानदाराकडे कोयत्याचा धाक दाखवत १५०० रुपयांची खंडणी मागितली. मात्र दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी दुकानातील काऊंटरची काच फोडून तसेच दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले.

यावेळी आरोपींनी हातातील कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करू,” अशी धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी आरोपींना अटक केली असून पुढील तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार हे करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group