पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) भोसरी परिसरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आणखी एका बांगलादेशी महिलेचा शोध घेऊन तिच्यावर कारवाई केली आहे. संबंधित महिलेला ताब्यात घेऊन तिच्या हद्दपारीची (डिपोर्टेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद गार्डन शेजारील परिसरात एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर २०२६ रोजी एटीबीच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी डायमंड लॉज येथे लवली रोविंदर जाट या नावाने राहणारी महिला आढळून आली. तपासादरम्यान तिच्याकडील आधारकार्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता तिने आपले खरे नाव लवली मो. अबु बकर सिद्दीक शेख (वय २९) असून ती बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची कबुली दिली. सुमारे दोन वर्षांपूर्वी ती बांगलादेशातून अनधिकृतपणे भारतात प्रवेश केल्याचेही तिने सांगितले. सध्या ती इंदौर (मध्य प्रदेश) येथे राहत असल्याचे तपासात समोर आले आहे.

तसेच ती मोबाईलवरील फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून बांगलादेशातील तिचा मुलगा, आई आणि इतर नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले. पुढील कारवाईसाठी तिला भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, परकीय नागरिक नोंदणी शाखेमार्फत तिला बांगलादेशात हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या २ मे २०२५ च्या परिपत्रकानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आढळणाऱ्या अनधिकृत बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना तातडीने हद्दपार करण्याची कार्यवाही केली जात आहे. त्यानुसार २ मे २०२५ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एटीबीने एकूण ३० बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला असून, त्यापैकी २६ जणांना बांगलादेशात हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित ४ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेने केली.


















Join Our Whatsapp Group