पिंपरी (Pclive7.com):- शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल २०२४ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पिंपरी गाव परिसरात घडली.

याप्रकरणी रवींद्र सुभाषराव शिलवंत (वय ४८, रा. श्री साई अपार्टमेंट, मंजुळा मासुळकर पार्क, पिंपरीगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश हरिराम कलानी (वय अंदाजे २८, रा. कृष्णा सायकलसमोर, पिंपरी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला यू.के. ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित असल्याचे सांगून फिर्यादी व इतरांना शेअर मार्केटमध्ये १० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गुंतवणूक केल्यानंतर पहिल्या दहा महिन्यांत दरमहा एक लाख रुपये, म्हणजेच एकूण दहा लाख रुपये परत मिळतील तसेच त्यावरील नफाही दिला जाईल, असे आश्वासन आरोपीने दिले होते.
मात्र, गुंतवणुकीनंतर आरोपीने ना मूळ रक्कम परत केली, ना कोणताही परतावा दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पिंपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड हे करीत आहेत.



















Join Our Whatsapp Group