पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशनच्या ‘उन्नतीच्या गणपती’च्या गणेशोत्सवात यंदाही सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश देण्यात आला. पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षकांच्या शुभहस्ते गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली.

विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी गणरायाच्या आरतीचा मान समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि घटकांना दिला जातो. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचा गौरव करणारा उत्सव व्हावा, ही या उपक्रमामागील भूमिका आहे.
यापूर्वी उन्नतीच्या गणरायाच्या आरतीचा मान सफाई कामगार, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, तृतीयपंथी बांधव यांच्यासह विविध समाजघटकांना देण्यात आला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा उन्नती सोशल फाऊंडेशन सातत्याने जपत आहे.

यावेळी बोलताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “उन्नतीचा गणपती हा केवळ फाऊंडेशनचा नसून पिंपळे सौदागर, रहाटणी आणि परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचा गणपती आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान व्हावा, ही आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कार देणाऱ्या महिला शिक्षकांच्या हस्ते आरती करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्हाला आनंद आहे.”
याचबरोबर उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री गणेश महापूजा, महाप्रसाद तसेच पिंपळे सौदागर, रहाटणी आणि परिसरातील विविध रहिवासी सोसायट्यांमधील ढोल-ताशा व लेझीम पथकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वाद्यसंस्कृती, पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती सखी मंचच्या सदस्या, ऑल सीनियर सिटीजन असोसिएशनचे सदस्य, विठाई वाचनालयाचे सदस्य, आनंद हास्य क्लबचे सदस्य तसेच पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा ‘उन्नतीचा गणपती’ यंदाही नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.



















Join Our Whatsapp Group