पिंपळे गुरव (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी दिलासा संस्था व मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदी घाटावर पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये गणेश मूर्तीदान व संकलनाबाबत जनजागृती करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी आयोजित या उपक्रमात दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, प्रकाश घोरपडे तसेच बालकलाकार काव्या घोरपडे व क्रांती घोरपडे यांनी सहभाग घेतला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विविध नदी घाटांवर विसर्जनासाठी हौद उभारले असून नागरिकांनी मूर्तीदान करावे किंवा हौदात विसर्जन करावे, असा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी नागरिकांना निर्माल्य नदीत न टाकता महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कुंडीत टाकण्याचे आवाहनही करण्यात आले.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मूर्ती विसर्जन होत असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. मूर्तीदान अथवा कृत्रिम हौदात विसर्जन केल्यास नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी काळानुरूप बदल स्वीकारणे आवश्यक आहे.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सांगितले की, ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांनी नदी स्वच्छ व निर्मळ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मूर्तीदानाचे महत्त्व सर्वसामान्यांना समजावे यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
उपक्रमादरम्यान पिंपळे गुरव घाटावर आतापर्यंत एकूण 1,500 गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. त्यामध्ये 400 शाडूच्या तर 1,100 पीओपी मूर्तींचा समावेश आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था तसेच बेसिक टीम यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची शपथही देण्यात आली.
यावेळी महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे यांनी या दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, महानगरपालिकेच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये पुढेही त्यांचा सहभाग घेतला जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमास मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, बेसिक टीमचे झोनल प्रमुख सुखदेव लोखंडे, सागर पाटील, शिवाजी निम्हण, वार्ड इन्चार्ज विजय पेंडे, दीपक चौरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती आणि मूर्तीदान करून करण्यात आली.


















Join Our Whatsapp Group