पिंपळे सौदागर (Pclive7.com):- सामाजिक आणि राजकीय बांधिलकीसोबतच सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर निनाद’ या सुरेल संगीत मैफिलीला परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी (दि. २०) सायंकाळी उन्नतीच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात गीतकार, संगीतकार आणि गायिका भारती न्यायाधीश तसेच त्यांच्या शिष्य कलावंतांनी शास्त्रीय, सुगम आणि चित्रपट गीतांचे बहारदार सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

मैफिलीची सुरुवात ‘आले रे गणपती आज दारी रे’ या गणेशस्तवनाने झाली. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील यमन, भूप, बिहाग, काफी आणि भीमपलास या रागांतील बंदिशी सादर करण्यात आल्या. अभिजात संगीताच्या सुरेल प्रवाहानंतर सुगम आणि चित्रपट गीतांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. कार्यक्रमाचा समारोप भारती न्यायाधीश यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने झाला.
या मैफिलीचे विशेष आकर्षण म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सदस्या व नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी संत तुकाराम महाराजांची ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना सादर करून आपल्या व्यक्तिमत्त्वातील कलागुणांची झलक रसिकांना दाखवून दिली.

कार्यक्रमात इरा, शौर्यवी, राघवी, ध्वनी, अथर्व, आस्मी, ओजस्वी, पयोधी, सौम्या, गार्गी आणि श्रीयान या बालकलावंतांसह सुलभा माने, प्रभा बसवंते, रेखा देवपूरकर, सुचिता सिदनाळे आणि सुनीता सावळे या ज्येष्ठ महिला शिष्यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण केले. सर्व कलाकारांना तबल्यावर चैतन्य डांगे यांनी तर संवादीनीवर भारती न्यायाधीश यांनी सुरेख साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन भामिनी महाले यांनी प्रभावीपणे केले.
उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे आणि उद्योजक धनंजय भिसे यांच्या हस्ते सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. संगीतप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या मैफिलीने परिसरातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध केले.


















Join Our Whatsapp Group