पिंपरी (Pclive7.com):- चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे आज गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी गोवा येथे निधन झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सध्या साजरा करण्यात येत असलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’मध्ये चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, गझलगायक आशिष मुजुमदार, ग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावत, ग्रंथपाल राजू मोहन, प्रवीण चाबुकस्वार, वर्षा जाधव, निदेशक रवींद्र ओव्हाळ, योगिता कोठावदे, बबिता गावंडे, व्ही. आर. कुंभार, शिक्षक गणेश लिंगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नाना पाटेकर यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचे स्मरण करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

ज्येष्ठ सिनेअभिनेते, दिग्दर्शक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीसह रंगभूमी आणि कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मराठी रंगभूमीवरून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी अनेक मराठी नाटकांमधून तसेच चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या. महाराष्ट्राच्या या सुपुत्राने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला. अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
संवेदनशील असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्याने सामाजिक बांधिलकी जपत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले. मराठी भाषा समृद्धीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून अभिजात मराठी भाषा सप्ताह कार्यक्रमात त्यांना रसिकांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



















Join Our Whatsapp Group