पिंपरी (Pclive7.com):- लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व निष्पक्षता राखण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी व सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी (दि. ८) ‘लोकशाही बचाव मार्च’चे आयोजन करण्यात आले. आकुर्डी गाव येथील विठ्ठल मंदिरापासून निगडी येथील तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मार्चमध्ये नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “लोकशाही वाचवा, संविधान वाचवा”, “SIR रद्द करा”, “मतदारांचा हक्क अबाधित ठेवा” आणि “मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे SIR प्रक्रिया रद्द करणे, मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, अशी भूमिका मांडली.
काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका करत लोकशाही व संविधान रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. SIR प्रक्रिया रद्द होईपर्यंत आणि संबंधित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात सामाजिक चळवळीचे नेते मानव कांबळे, मारुती भापकर, शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, मनसेचे अध्यक्ष सचिन चिखले, आपचे पदाधिकारी, सीपीआय(एम)चे कॉम्रेड अजित अभ्यंकर, सीपीआयचे गणेश दराडे, भगतसिंग विद्यार्थी संघटनेच्या स्वप्नजा काळे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी इशारा देताना सांगितले की, शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी भविष्यात आणखी व्यापक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.



















Join Our Whatsapp Group