पुणे (Pclive7.com):- ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार भाई जगताप, हेमंत पाटील, अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, अमित गोरखे, भिमराव तापकीर, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, महापौर मंजुषा नागपुरे, सभापती युवराज काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मराठी रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रदीर्घ कलाप्रवासात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत रसिकांच्या मनावर ठसा उमटविला. अभिनयासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
अंत्यसंस्कारापूर्वी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी डोणजे येथे नागरिक, कलाकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, चाहते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पोलिस दलाच्यावतीने शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.


















Join Our Whatsapp Group