पिंपरी (Pclive7.com):- शहरातील केएसबी चौकाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केएसबी चौकातील पुलावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील आठ वर्षीय चिमुकली हातिन फरान मोमीन हिचा मृत्यू झाला आहे. तर तिचे वडील फरान मोमीन (वय ३२), आई मारिना फरान मोमीन गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी निगडी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृत मुलीचा मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्दैवी अपघातामुळे एका चिमुकलीचा जीव गेला असून, तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

















Join Our Whatsapp Group