पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवी येथील क्रांती चौकातील शिंगोरे बिल्डिंगमध्ये मालमत्तेच्या वादातून एका वृद्ध महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगल बाबूराव शिंगोरे (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी मृत महिलेचा सावत्र नातू ओंकार किसन शिंगोरे याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेत हिस्सा दिला जात नसल्याच्या रागातून ओंकार याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी ऑनलाइन मागवलेल्या चाकूंच्या सेटमधील एका चाकूने त्याने आजीवर वार केल्याचे तपासात समोर आले आहे.

खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर
आजीची हत्या केल्यानंतर आरोपी ओंकार शिंगोरे हा स्वतः सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीवर यापूर्वीही खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मृत मंगल शिंगोरे यांच्या ३८ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नवी सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे.



















Join Our Whatsapp Group