पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना एका बेवारस वृद्ध रुग्णाला धावत्या ॲम्ब्युलन्समधून खाली पडावे लागल्याची घटना घडली. रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित बंद नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णवाहिका चालकाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका बेवारस वृद्ध रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात होते. मात्र, रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित बंद आहे की नाही, याची खात्री चालकाने केली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे धावत्या ॲम्ब्युलन्समधून वृद्ध रुग्ण खाली पडला. रुग्णाच्या सुरक्षिततेची जबाबदारी असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा कसा होऊ शकतो, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेतील सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे, रुग्ण खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर काही किलोमीटर पुढे गेलेली रुग्णवाहिका पुन्हा घटनास्थळी परत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर चालकाने वृद्ध रुग्णाला पुन्हा रुग्णवाहिकेत घेतले आणि तेथून निघून गेल्याचे सांगितले जात आहे.

रुग्णवाहिका ही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यासाठी असते. मात्र, अशा वाहनातूनच रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. विशेषतः बेवारस आणि असहाय्य रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत अधिक संवेदनशीलता दाखविणे आवश्यक आहे.
या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन घटनेची सखोल चौकशी करावी, रुग्णवाहिका चालकाच्या निष्काळजीपणाची पडताळणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली, वृद्ध रुग्णाची प्रकृती कशी आहे आणि या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून काय कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

















Join Our Whatsapp Group