पिंपरी (Pclive7.com):- मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात दीर्घ आजाराने मधु कांबीकर यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांची लावणी कलावंत म्हणूनही ओळख होती. मधु कांबीकर यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मधु कांबीकर यांनी नाटक, सिनेमा माध्यमातून अमाप लोकप्रियता मिळवली.

नोव्हेंबर २०१६ रोजी, मुंंबईतील एका कार्यक्रमात लावणीचं सादरीकरण करताना त्या बेशुद्ध झाल्या. तेव्हापासून त्या अंथरुणावर खिळून होत्या. अखेर आज दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला अनेक वगनाट्यांमधून काम केलं. दादू इंदूरीकरांच्या गाढवाचं लग्न नाटकात मधु कांबीकर यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. पुढे ‘भानगडीशिवाय पुढारी नाही’, विच्छा माझी पुरी करा या गाजलेल्या नाटकांमधून मधु कांबीकर यांनी रंगभूमी गाजवली.

मधु कांबीकर यांची सिनेसृष्टीतील कारकीर्दही समृद्ध करणारी होती. १९७७ ते २०१५ दरम्यान मधु कांबीकर यांनी गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. बिन कामाचा नवरा, सतीची पुण्याई, एक होता विदुषक, चल रे लक्ष्या मुंबईला, झपाटलेला, मुक्ता, कुंकू, राजा पंढरीचा, गोष्ट छोटी डोंगराएवढी अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये मधु कांबीकर यांनी काम करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. मधु कांबीकर यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

















Join Our Whatsapp Group