पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये शीतल शिंदे यांची वर्णी लागल्यापासून त्यांची निवड होणार ही चर्चा होती. दस्तुरखुद्द लक्ष्मण जगताप त्यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. एवढेच नाही तर जगताप यांनी आमदार महेश लांडगे गटाकडून शिंदे यांच्या नावासाठी ‘हिरवा कंदील’ घेतला होता अशी ही चर्चा आहे. शीतल शिंदे यांच्यानंतर पुढील सलग दोन स्थायी अध्यक्षपद भोसरीलाच मिळणार असा प्रस्ताव देत जगताप यांनी भोसरीकरांचे मन वळवले अशी माहितीही काही विश्वासू सूत्र देत आहेत.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होता. हिरवा कंदील घेऊन जगताप यांनी शिंदे यांना गाफील ठेवत अखेरच्या क्षणी विलास मडेगिरी यांचा पत्ता उघड करत एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. शीतल शिंदे यांनी २०१४ च्या निवडणुकीत जगतापांचे काम केले नाही, याचा त्यांनी वचपा काढल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भोसरीच्या महेश लांडगे यांना राजकारणात आपणच ‘वरचढ’ असल्याचा ‘संदेश’ही त्यांनी यातून दिला आहे. विलास मडेगिरी पुढे जाऊन महेश लांडगे यांच्यासाठी प्रतिस्पर्धीही होऊ शकतात. हे देखील ओघाने आल्याने जगताप यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. कधी काळी लक्ष्मण जगताप यांच्या जवळचे असलेल्या सीमा सावळे यांच्याच प्रभागात दुसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्षपद देत त्यांच्यावरही जगतापांनी कुरघोडी केली असल्याचे बोलले जात आहे. आता या केवळ चर्चा असल्यातरी किमान शहरात मी म्हणजेच भाजप हा ‘संदेश’ त्यांनी नक्की दिलाय हे मात्र नक्की.
आता शीतल शिंदे त्यांची बंडखोरी म्यान करतात, की थेट भाजप अर्थात लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात बंड करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.