पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा भोंगळ कारभार अनेकदा समोर आला आहे. रूग्णालयामधील शवविच्छेदन केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने मृतदेह ठेवलेले कोल्डस्टोरेज तब्बल १६ तास बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वीज पुरवठा नसल्याने कोल्डस्टोरेजमधील मृतदेह कुजण्याची भीती निर्माण झाली होती.
शुक्रवारी दि.७ रोजी संधाकाळी पिंपरी शहरात अचानक जोरदार वादळ आले होते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसतील एक झाड कोसळले. त्यामुळे शवविच्छेदन केंद्राचा विद्युत पुरवठा रात्री १२ वाजता खंडीत झाला होता. या घटनेनंतर आता तब्बल १६ तासांनी म्हणजेच आज दि.८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. १६ तास वीज पुरवठा नसल्याने कोल्ड स्टोरेजमधील ४ मृतदेह कुजण्याची भीती निर्माण झाली होती.
दुसरीकडे या कालावधीत नवे मृतदेह घेणं बंद करण्यात आले होते. कोल्डस्टोरेजमधील मृतदेह नातेवाईकांना घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, या बाबत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता वाबळे यांना विचारणा केली असता लवकरच विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाईल, हे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, कोल्ड स्टोरेज सुरू राहावा यासाठी पर्यायी व्यवस्था का केली नाही, या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. या सगळ्या प्रकारामुळे शहरातील विविध संघटनांकडून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
या घडलेल्या प्रकाराचे वायसीएम रूग्णालय आणि महापालिका प्रशासनाला सोयरंसुतकं नाही. येथील शवागृहाला जनरेटर बँकअप आवश्यक आहे. यापुर्वीही अनेकदा अशा प्रकारे वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यावेळेसही मृतदेह कुजण्याची भिती निर्माण झाली होती. प्रशासनाकडून या गोष्टीची गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी देखील होत आहे.






















Join Our Whatsapp Group