भोसरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीतील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत झालेल्या भांडणातून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान तोडफोडीच्या निषेधार्थ शनिवारी दिवसभर चिखलीतील साने चौक परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला होता.
देवेंद्र बीडलांन (रा. औंध रोड, खडकी), सॅमसंग (रा. खडकी) या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. तर इतर फरार आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या साने चौक येथील कार्यालयाची काही हल्लेखोरांनी हत्यारांसह शुक्रवारी तोडफोड केली होती. कार्यालयातील कर्मचारी महिलेलाही मारहाण करून कार्यालयाचे मोठे नुकसान केले होते. भर चौकात, रहदारीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने व्यापारी आणि छोट्या – मोठ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यातील गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास कार्याला गती देऊन आरोपींना अटक केली.
भोसरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर अवताडे, देवेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चिखली पोलिसांकडे स्वाधीन केले. साने यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणासोबत झालेल्या वादातुन हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे.






















Join Our Whatsapp Group