पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र पराभवामुळे खचून न जात पार्थ यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने आदी पदाधिकाऱ्यांच्या कार्यलयात जाऊन आज पार्थ पवार यांनी चर्चा केली आहे.
राजकारणात पहिल्यांदाच एन्ट्री केलेल्या पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठी ताकद लावली होती. अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक ठरली होती. मात्र निवडणुकीत दोन लाखांच्या मताधिक्क्याने पार्थ पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. अजित पवार यांनी स्वत: या पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. तर स्वत: पार्थ पवार या पराभवाने खचून न जाता पुन्हा राजकारणात सक्रीय झालेत. काही दिवसांपूर्वी देहूरोड येथे ईदनिमित्त इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला पार्थ यांनी उपस्थिती लावली होती. तर आज पिंपरी चिंचवड शहरात येऊन स्थानिक नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या पिंपरीगावातील कार्यालयात येऊन पार्थ पवार यांनी चर्चा केली. यावेळी संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, डब्बू आसवानी, नगरसेविका उषाताई वाघेरे पाटील, युवा नेते ऋषीकेश वाघेरे पाटील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक पंकज भालेकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.