मोशी (Pclive7.com):- पुणे महानगरपालिका त्यांचा कचरा मोशी कचरा डेपोजवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर पुणे महानगरपालिका मोशीतील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत नसेल, तर शासनाने मोशीगाव पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून वगळावे. गाव बंद आंदोलन यशस्वी करून दाखवले. आता वेळप्रसंगी उपोषण करु, रक्त सांडू.. पण पुण्याचा कचरा मोशीगावात येऊ देणार नाही असा इशारा स्थानिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी दिला आहे. रविवारी झालेल्या ‘गाव बंद’ आंदोलनानंतर स्थानिक पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजून गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिका त्यांचा कचरा मोशी कचरा डेपोजवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ता सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्याचा भार मोशी गावातील नागरिक सोसत आहेत. आधीच मोशीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न धोक्यात आहे. याआधीही मोशीतील नागरिकांनी भरपूर आंदोलने केली आहेत. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी तर नागरिकांनी व सर्व पक्षिय नेते-कार्यकर्त्यांनी कचरा डेपोकडे जाणारा रस्ता बंद केला होता.
आता तर मोशीकरांच्या आरोग्याचा विचार न करता पुणे महानगरपालिका कचरा मोशी कचराडेपोजवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे.पुणेकर जे जगात भारी, पुणेरी थाट मिरवतात त्यांना आमचं एकच सांंगण आहे की, रविवारी तुम्ही आमच्या गावची एकी पाहिली असेल. समस्थ ग्रामस्थांच्या गावबंद आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. १०० टक्के यशस्वी बंद झाला. पुण्याच्या कचऱ्याला मोशी, डुडळगाव, चर्होली, भोसरी आणि चिखली या सर्व गावांचा विरोध आहे. हा आमचा लढा यापुढेही असाच चालू राहणार आहे. वेळप्रसंगी उपोषण करु, आमचं रक्त सांडू पण हा लढा चालू ठेवू. पुण्याचा कचरा मोशीत येण्यास आमचा सर्वांचा विरोध आहे. आणि विरोधच राहणार आहे. ही आमची भुमिका आहे असं ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी म्हटलं आहे.






















Join Our Whatsapp Group