पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, सेवा विभागांतर्गत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी वारकरी बांधवांना मोफत औषधोउपचार करिता ५ रुग्णवाहिका व आरोग्य सेवा पथक रवाना करण्यात आले. या रूग्णवाहिकांचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त चैतन्य महाराज देव, आमदार महेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी देहू आणि आळंदी ते पंढरपूर जाते. यात लाखो भाविक, वारकरी ऊन, वारा, पाऊसाची तमा न करता पालखी सोबत टाळ, मृदुंगाच्या साथीने विठुनामाचा गजर, भजन करत पायी चालत असतात. या पायी वारीत दर वर्षी विश्व हिंदू परिषद, सेवा विभागांतर्गत वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. याही वर्षी पाच रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर व सेवेकरी पंढरपूर पर्यंत पूर्णवेळ ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. वारीमध्ये वारकरी आपले घर, संसार व काम धंदा बाजूला ठेवून “भेटी लागी जिवा, लागलीशी आस” पांडुरंगाच्या दर्शनासाठी मनोभावे अनेक मैल पायी चालत असतात. पायीवारीत वारकरी चालत असताना त्यांना होणाऱ्या वेदना व त्रासाला तातडीक उपचार मिळण्यासाठी हे पथक सज्ज करण्यात येते. या सेवेत सर्व आजारांच्यावर उच्च दर्जाचे गोळ्या, औषधे, सलाईन असे प्रथमोपचार उपलब्ध आहेत.
या सेवा उद्घाटन समारंभ प्रसंगी विश्व हिंदू परिषद, मुंबई क्षेत्र संघटन मंत्री श्रीरंगजी राजे, विश्व हिंदू परिषदचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजयराव देशपांडे, प्रांत सेवा प्रमुख, दादा ढवाण, प्रांत प्रचार प्रसिद्धी प्रमुख विवेक सोनक, प्रांत सेवा विभाग पूर्ण वेळ, संजयराव कुलकर्णी तसेच जिल्हा अध्यक्ष, शरदराव इनामदार, प्रांत सदस्य, रा.स्व.सं., विनायकजी थोरात, पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मजागरण प्रमुख, हेमंतराव हरहरे, जिल्हा कार्यवाह रा.स्व..सं, विलासराव लांडगे, संयुक्त चिंचवड जिल्हा, कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, जिल्हा मंत्री, नितीन वाटकर, जिल्हा सेवा प्रमुख, अविनाश कदम व जिल्हा सह सेवा प्रमुख भास्कर गोडबोले तसेच मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सहमंत्री संजय शेळके यांनी केले व जिल्हा मंत्री नितिन वाटकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. आषाढी वारीसाठी विश्व हिंदू परिषदने मोठ्याप्रमाणात औषधे व सेवा पथकाचे आयोजन करून वारकऱ्यांची सेवा करणारी एकमेव संघटना आहे. आणि या संघटने मार्फत असेच देव, देश, धर्मकार्य आणखी चांगल्या स्वरूपात घडो अशी शुभेच्छा उद्घाटन प्रसंगी चैतन्य महाराज देव यांनी दिल्या अशी माहिती जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी दिली.