पिंपरी (Pclive7.com):- हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा जगण्याचा संघर्ष सोमवारी पहाटे थांबला. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली.
हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरूणीनं आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.
ऑरेंज सिटी रूग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी (१० फेब्रुवारी) ६.५५ मिनिटांनी पीडितेचा रक्तदाब कमी झाला. त्यातच ह्रदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यु झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.






















Join Our Whatsapp Group