पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील जवान देशसेवा करताना शहीद झाल्यास त्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक संघ व नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात महापौर माई ढोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी सैनिक संघ भोसरी विधानसभा अध्यक्ष नवनाथ मुऱ्हे, नवाज शेख, गणेश यादव, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव उपस्थित होते.
महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने सैनिक कुटुंब शिक्षण आणि रोजगाराच्या उद्देशाने स्थायिक झालेले आहेत. आज शहरात कित्येक वर्षांपासून राहत असलेल्या या सैनिक परिवारातील मुले सैन्यात देशसेवा करत आहेत. जम्मू काश्मीरसह लेह-लडाख व इतर भागात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सीमेवर देश रक्षणासाठी तैनात आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील जवान शहीद झाल्यावर केंद्र सरकार तसेच राज्य सरकार व स्थानिक पातळीवर शहीद परिवारास आर्थिक मदत केली जाते. तर महापालिकेकडून देखील मदत करण्यात यावी.
कुंदन गायकवाड म्हणाले की, राज्यात व देशात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नावलौकिक आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील जवान देशसेवा करताना शहीद झाल्यास त्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या वतीने पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे धोरण सर्वसाधारण सभेत मंजूर करून या आशयाचा प्रस्ताव पालिकेने सरकारकडे पाठवावा. असे धोरण राबविणारी देशातील आपली प्रथम महापालिका असणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध झालेला हा निधी शहीद कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी खूप मोठा हातभार लावेल आणि सैनिक परिवाराचे मनोबल निश्चितच उंचावले जाईल. जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचा मान-सन्मान राखण्याचे कार्य या निमित्ताने निश्चितच होईल.






















Join Our Whatsapp Group