पिंपरी (Pclive7.com):- पुढील २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदी सुरू आहे. जीवनावश्यक सेवा वगळता सर्वांना घरातून बाहेर पडू नये असे आदेश आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वाहतूकीसंदर्भात अनेक अडचणी तसेच प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणूनच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसंदर्भात माहितीसाठी हेल्पलाईन/व्हॉटस्अॅप नंबर सेवा सुरू केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू राहणार आहे. या वाहतुकीसंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच माहिती मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. ९५२९६९१९६६ या क्रमांकावर अत्यावश्यक सेवेतील वाहतूक करणाऱ्यांना संपर्क साधता येणार आहे. अत्यावश्यक सेवेची वाहतूक करताना काही अडचणी आल्यास या नंबरवर संपर्क साधण्यासाठी पोलीसांनी ही सेवा सुरू केली आहे.
रुग्णालय व संबंधित वैद्यकीय आस्थापना, त्यांची उत्पादने व वाटप करणाऱ्या सरकारी, खाजगी आस्थापना (उदा. केमिस्ट शॉप, प्रयोगशाळा, दवाखाने, नर्सिंग होम, रुग्णवाहिका, वैद्यकीय उत्पादने विक्री दुकाने, वैद्यकीय उत्पादनांसाठी लागणारी रसायने, रुग्ण सेवेशी संबंधित व्यक्ती, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी यांना संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. या सर्वांच्या वाहतूकीसंदर्भात कोणतीही तक्रार अथवा माहिती हवी असल्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.