पिंपरी (Pclive7.com):- सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून रेशन खरेदीसाठीचा नकली फॉर्म व्हायरल केला जात आहे. त्याच बरोबर कोरोना संदर्भात सोशल मीडियावर खोट्या बातम्या प्रसारीत होत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी विभागीय आयुक्त पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अफवा व खोट्या व्हायरल झालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अशा खोट्या अनेक विविध कोरोना विषयी बातम्या प्रसार करणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखा यांना कायदेशीर कारवाई करावी असे आदेश विभागीय आयुक्त पुणे व पोलीस आयुक्त यांनी द्यावे अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group