पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. दिल्लीतील मरकज, निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता उपस्थित राहून कोणी पिंपरी चिंचवडमध्ये आले असल्यास त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन महापालिकेला त्याची माहिती द्यावी तसेच आवश्यकतेनुसार तपासणी करून घ्यावी त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळणार आहे असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, मरकज निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता दिल्ली येथे उपस्थित राहिलेल्या शहरातील नागरिकांपैकी काही व्यक्तींना व त्यांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
परंतु अद्यापही सदर धार्मिक परिषदेकरिता उपस्थित राहिलेले अनेक नागरिक त्यांची ओळख उघड करित नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाला देखील त्याचा धोका संभावतो. आजमितीपर्यंत शहरातील सर्व नागरिकांनी मनपा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे व यापुढेही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे.
तरी पिंपरी चिंचवड शहराचे रहिवाशी असलेल्या सर्व नागरिकांना महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येते की, जर आपणापैकी कोणीही मरकज, निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता दिल्ली येथे उपस्थित राहिला असाल तर आपण स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच आवश्यकतेनुसार तपासणी करुन घ्यावी. आपल्या सदर कृत्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास हातभार लागणार आहे. याकामी महानगरपालिकेचा हेल्पलाईन क्र. ८८८८००६६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group