पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत-धर यांनी आज स्वखर्चाने पिंपरी चिंचवड मुख्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्या सुरक्षितेसाठी प्रवेशव्दारावर सॅनिटायझर टनेल बसविले आहे. सदर सँनिटायझर टनेलचे उद्घघाटन महापौर उषा (माई) ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, वैशाली काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे, अति. आयुक्त अजित पवार आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोना बाधित रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागात सापडत आहेत. आजपर्यंत ६२ कोरोनाचे रूग्ण शहरात आढळले आहेत. त्यांच्यापैकी १७ रुग्णांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात येऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ३८ रुग्णांवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. राज्यात तसेच पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा, पोलिस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे, परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अजून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. या अनुषंगाने संत तुकारामनगर येथिल मनपाचे वाय.सी.एम. रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांसाठी घोषीत करण्यात आले आहे. व या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी वअन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या सुरक्षितेसाठी त्यांचा संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून तिथे सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा मुख्यालयामध्येही कोरोना विषाणूच्या अनुषंगाने विविध बैठका होत असतात. यामध्ये पोलिस प्रशासन अत्यावश्यक सेवेतील अधिकारी डॉक्टर्स व कर्मचारी आदीचा समावेश असतो.
त्यामुळे मनपा मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावर सॅनिटायझर टनेल बसविण्याची मागणी होत होती.
यावेळी बोलताना सुलक्षणा धर म्हणाल्या की, आज कोरोना विषाणूच्या विरोधात मनपा प्रशासन, पोलिस प्रशासन दिवसरात्र लढत आहे. त्याच प्रमाणे सत्ताधारी व विरोधी पक्षही या साथीच्या विरोधात एकजुटीने लढत आहे.त्यामुळे एक नगरसदस्या म्हणून मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून सदरचे सॅनिटायझर टनेल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपल्या कर्मचारी व अधिकारी यांना याचा उपयोग होईल व कोरोनाच्या या लढाईच्या विरोधात लढण्यास आपल्या अधिका-यांना व कर्मचा-यांना बळ मिळेल.






















Join Our Whatsapp Group