पुणे (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसंच पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैपासून पुढचे 15 दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.
अजित पवारांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा परिसरातही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येईल. सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात पुढील 15 दिवस पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येईल.
यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने 9 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सचूना दिल्या.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागात कंटेन्मेंट झोन तयार करा. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि तपासणी प्रभावीपणे करा. कोरोना तपासणी अहवाल लॅबकडून 24 तासात मिळण्यासाठी प्रयत्न करा, असंही नवल किशोर राम यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group