– गोविंद वाकडे –
पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते पार्थ पवार ह्यांनी आज दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले. साने कुटुंबियांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष कायम खंबीरपणे उभा असेल अशी ग्वाही पार्थ पवार यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मयुर कलाटे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ नगरसेवक, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक असलेल्या दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला होता. साने यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे शहराबरोबरच राष्ट्रवादी पक्षाचा खंदा शिलेदार गमावल्याच दुःख व्यक्त करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार आणि आता पार्थ पवार यांनीही साने यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याच सांगितलं आहे. दरम्यान साने यांना ज्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार केल्या गेले नसल्याचा आरोप करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी साने ह्यांच्या कुटुंबीयांनी पार्थ पवार यांच्याकडेही केली. त्यावेळी आपण ह्या मागणी बाबत नक्कीच संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देत पार्थ पवार यांनी आपल्यातील संवेदनशीलतेच दर्शन घडविले. त्यानंतर साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून, कुटुंबीयांनी केलेल्या मागणी संदर्भात पार्थ पवार ह्यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेतली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.























Join Our Whatsapp Group