मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण आज (दि.१८) ७५ टक्के भरले आहे.
पवना धरण परिसरात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी डोंगर भागातून धरणात येत असलेले पाण्याचे प्रवाह यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आज मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यत धरणात ७४.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारच्या २४ तासात धरण परिसरात केवळ २६ मिमी पाऊस झाला. मात्र पाणीसाठ्यात २.११ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत पवना धरणात ९९.१४ टक्के इतका पाणीसाठा होता.
पवना धरण क्षेत्रात मागील आठवडाभर जोरदार पाऊस झाल्याने ३५ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणात आज ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. १ जुन पासून धरणाच्या साठ्यात ४० टक्के वाढ झाली आहे. यावर्षी आज मंगळवारपर्यत पवना धरण परिसरात एकूण १२१९ मिमी पावसाची नोंद झाली. लवकरच धरण शंभरी गाठणार असल्याने पुढील वर्षभराची नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे, ही मावळ व पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी आहे.






















Join Our Whatsapp Group