पुणे (Pclive7.com):- मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. बुधवारपासून पाऊस सुरू असलेल्या पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं होतं तर भरपूर घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
वडगाव शेरी, रामवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, सोपाननगर, चंदननगर, खराडी आपले घर या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं. या भागात वीजही गेल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीन भर पडली होती.
वडगाव बु. येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या पायथ्याजवळ असलेल्या ज्ञानगंगा सोसायटीत दोन भिंती कोसळल्या. सुदैवाने नागरिक जागेच असल्याने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. परिसरात पाणीच पाणी झाले होते. सिंहगड रोडला हिंगणे चौक परिसरात पावसाच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हवाई गणपती मंदिरासमोरचं रात्रीचं दृश्य अतिशय भयभीत करणारे होते. मंदिरासमोरील रस्त्यावरून नदी वाहत असल्यासारखं वाटत होते.
शिवाजीनगर भागात सकाळी ८.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत ९६ मिलीमीटर पावसाची नोंद, झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. दरम्यान, नाझरे धरणातून मध्यरात्रीपासून ४००० क्यूसेक वेगाने पाणी सोडलं होतं.
दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर १३३ मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे. आंबील ओढा परिसरात आपल्या महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथकं सज्ज असून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं.






















Join Our Whatsapp Group