पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांनी ७ ऑक्टोबर रोजी चाकण येथून २० कोटी रुपयांचे २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणेपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजणगाव येथील औषध निर्मितीच्या बंद पडलेल्या कंपनीत हे ‘मेफेड्रोन’ तयार केले आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत १३० किलो ‘मेफेड्रोन’ तयार करण्यात आले आहे. तसेच, या रॅकेटमध्ये नायजेरियन गुन्हेगारासह छोटा राजन टोळीचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
तुषार सुर्यकांत काळे (रा. बोरीवली), राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई), किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे यांच्यासह झुबी इफनेयी उडोको या नायजेरियन गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चेतन फक्कड दंडवते (२८, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (२५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (२५, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे पकडलेल्या मेफेड्रोन प्रकरणाची व्याप्ती पाहून त्यांनी या तपासासाठी सहा वेगवेगळी पथके तयार केली. यातील एका पथकाने आरोपी किरण राजगुरू, अशोक संकपाळ आणि किरण काळे यांना अटक केली. यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर असून त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी रांजणगाव येथील संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मेफेड्रोन बनवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी रांजणगाव येथे छापा मारून मेफेड्रोन बनवण्याच्या मशिनरीसह कंपनी सील केली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले, उपनिरीक्षक चामले, काळूराम लांडगे यांच्या पथकाने केली.
‘झुबी’ने दहा वर्ष भोगला तुरुंगवास
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला झुबी इफनेयी उडोको हा सराईत गुन्हेगार असून तो नायजेरियन आहे. अंमली पदार्थ तस्करीमध्ये त्याचा हातखंडा असून त्याचे मोठे बॉलिवूड कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झुबी याला यापूर्वी अमली पदार्थ तस्करीमध्ये अनेकदा अटक करण्यात आली आहे. तसेच, तो कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा देखील भोगून आला आहे.
१३२ पैकी ११२ किलोची झाली विक्री
आरोपींनी रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या कंपनीत एकूण १३२ किलो मेफेड्रोन बनवले होते. यातील ११२ किलो मेफेड्रोनची आरोपी तुषार काळे याने झुबीच्या मदतीने बाजारात विक्री केल्याची कबुली दिली आहे. तर, उर्वरित २० किलो पिंपरी- चिंचवड पोलिसांनी चाकण येथून जप्त केले आहे.
रांजणगावच निवड का ?
आरोपी मेफेड्रोन बनवण्यासाठी जागा शोधत असताना त्यांची ओळख किरण काळे याच्याशी झाली. तो रांजणगाव एमआयडीसी येथील एका कंपनीत संचालक पदावर काम करत होता. त्याच्या ओळखीने संयोग बायोटेक ही बंद पडलेली कंपनी मिळाल्याने आरोपींनी रांजणगावची निवड केली.
आरोपींची खाती केली ‘फ्रिज’
आरोपी तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर हे गुन्ह्याचे मास्टरमाईंड असून त्यांनी अन्य आरोपींना मेफेड्रोन बनवण्याची किलोमागे ६० हजार इतका दर ठरवून दिला होता. तुषार काळे याने मेफेड्रोन बनवण्यासाठी आत्तापर्यंत ६७ लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याने पोलिसांनी सर्व आरोपींची बँक खाती ‘फ्रीज’ केली आहेत. तसेच, पोलिसांनी आत्तापर्यंत ८५ लाखांची रोकड जप्त केली आहेत. तुषार काळे याने पालसाई, ता. वाडा, जि. पालघर येथे ७५ लाख रुपये किमतींची दोन एकर जमीन विकत घेतल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. ती देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.
काळेचे छोटा राजन गॅगशी थेट संबंध
आरोपी तुषार सुर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे छोटा राजन टोळीशी थेट संबंध आहेत. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार बाळगणे असे एकूण ८ गुन्हे दाखल असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.






















Join Our Whatsapp Group