पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा असतानाही बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून जागा विकून त्यापोटी १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकासह दोघांना भोसरी पोलिसांनी गजाआड केले आहे. हा प्रकार २० मे २०२१ रोजी उघडकीस आला.
भाजप नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय-४२, रा. भोसरी) याच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय-३८, रा. भगत वस्ती, हनुमान नगर, भोसरी) याला अटक केली आहे. तर, रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय-४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ (वय-३७) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजेंद्र लांडगे हे भोसरीतील धावडे, भगतवस्ती प्रभागातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. स्थायी समितीचे माजी सदस्य, शहर सुधारणा समितीचे माजी सभापती असून सध्या ते ‘क’ प्रभागाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरसेवक लांडगे याने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इंद्रायणीनगर येथील जागा सर्व्हे नं.२२ मधील ९३६ चौ. फुट जागा शर्मा आणि ठाकूरला १५ लाख ८० हजार रूपयांना विकली.
जागेवर अतिक्रमण करून शर्मा आणि ठाकूरने १८७२ चौ. फुट बांधकाम बांधले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मिळकत कर पावती बनवून घेतली. बनावट कागदपत्रे देऊन महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले. भोसरी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, प्राधिकरणाची जागा विकून नगरसेवकाने पैसे लाटल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणासह भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.