पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासून त्यांच्या दालनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा तानाजी शेंडगे-धायगुडे (वय ४७, रा. सरिताकुंज,कासारवाडी) यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आज (दि.११) पिंपरी न्यायालयाने त्यांच्यासह या गुन्ह्यातील त्यांच्या समर्थक महिलांसह दहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा, पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
९ सप्टेंबर रोजी नगरसेविका आशा शेंडगे व साथीदार महिलांनी महापालिकेत येऊन राडा केला. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनाबाहेर त्यांनी गोंधळ घातला. आयुक्तांच्या कामात अडथळा आणत त्यांच्या नामफलकाला काळे फासले. तसेच महापालिकेचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्याही केबिनमध्ये घुसून त्यांच्या टेबल व खुर्चीवर या टोळक्याने शाई फेकली होती. त्याबद्दल सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शेंडगे व इतर दहाजणांविरुद्ध नोंदवून पिंपरी पोलिसांनी शेंडगेंसह आठ महिला व दोन तरुणांना लगेचच अटक केली होती. त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी काल (दि.१०) न्यायालयाने दिली होती.
त्यामुळे आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, पुन्हा त्यांची पोलिस कोठडी न मागता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. आरोपी हे सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. जप्त करण्यात आलेली शाईची बाटली आरोपींनी कोठून आणली त्याचा तपास करायचा आहे. ११ वा आरोपी संजय शेंडगे याचा शोध घेऊन त्यालाही अटक करायचे असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळताच पाच महिला आरोपींना लहान मुले असल्याचे सांगून त्यांना तात्पुरता जामीन देण्यासाठी आरोपींचे वकिल अॅड. सुनील कडूसकर यांनी अर्ज केला. मात्र, ती मुले चार वर्षे व त्यापेक्षा मोठी असल्याचे दिसून आल्याने तो फेटाळण्यात आला. त्यामुळे येत्या मंगळवारी (दि.१४) पुणे सत्र न्यायालयात सर्वच आरोपींच्या नियमित जामीनासाठी अर्ज करणार आहे, असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले.