पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची बुधवारच्या (दि.२०) सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे.
महापालिकेच्या आगामी अर्थात फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीचा विचार करता अवघे अडीच ते तीन महिने सदस्यांना मिळणार आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व विद्यमान सदस्यांनाच कायम ठेवणार की आजपर्यंत कोणतेच पद न मिळालेल्यांना अथवा मर्जीतील नगरसेवकांना संधी देणार याचा उलगडा महासभेतच होणार आहे.
विषय समित्यांच्या सदस्यांची मुदत एक वर्षांची असते. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये मुदत संपलेल्या समित्या बरखास्त झाल्या होत्या. कोरोनामुळे निवड लांबणीवर पडली होती. त्या सर्व समित्यांवर ऑक्टोबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी काही सदस्य व अध्यक्षांची भाजप नेतृत्वाने पुन्हा निवड केली होती.
आता त्या सर्वांची मुदत संपली आहे. काही सदस्यांनी आपल्याला विषय समित्यांवर संधी मिळावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली आहे. त्या मागणीचा विचार होणार की, आहे त्याच सदस्यांना पुढील अडीच-तीन महिन्यांसाठी कायम ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी एक महिना अगोदर आचारसंहिता लागू शकते. याचा विचार केल्यास विषय समिती सदस्यांना कामकाज पाहण्यासाठी केवळ अडीच ते तीन महिने कालावधी मिळणार आहे.





















Join Our Whatsapp Group