पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या अशा प्रबोधनकार ठाकरे वाचनालय व मोहननगर शिवसेना शाखेचे नूतनीकरण करण्यात आलेले होते. या नवीन वाचनालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवार (दि.०२) रोजी सायंकाळी ७ वाजता शिवसेना उपनेते, सातारा संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील आणि पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैभव थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरवात प्रभागातील अंध व्यक्तींच्या संगिताने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून उद्घाटन सोहळा पार पडला. प्रभागाच्या मा. नगरसेविका मीनल यादव यांनी प्रथम सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. नितिन बानगुडे पाटील, वैभव थोरात, शिवसेना नेत्या सुलभाताई उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, राजेश वाबळे, युवराज कोकाटे, भाविक देशमुख, वैशाली मराठे यांच्यासह अनेक मान्यवरांना फोटो फ्रेम, शाल, श्रीफळ देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले.

स्वागतामध्ये मीनल यादव यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये प्रभागात केलेल्या विविध विकासकामांचा, कोरोनाच्या काळामध्ये पुरविलेल्या सेवांचा, मदतीच्या कामांचा लेखाजोखा मांडला.
त्यानंतर शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, शहराध्यक्ष सचिन भोसले, संपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नगरसेविका मीनल यादव व शिवसेना संघटक विशाल यादव यांनी प्रभागात केलेल्या विविध विकासकामांचे कौतुक केले.
शिवकन्या कुमारी ईश्वरी मनोज मोहिते हिने छत्रपती शिवाजी महाराजांची गारद देऊन बानगुडे पाटलांच्या व्याख्यानास सुरवात झाली. त्यानंतर शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी “शिवसेना काल आज आणि उद्या” या विषयावर साधारणत एक ते दीड तास आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या वेळी मोहननगर छत्रपती शिवाजी महाराज कमान ते गाय वासरू चौकापर्यंत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षय मोरे यांनी केले. तर आभार विशाल यादव यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मोहननगर शिवसेना शाखा, विशाल यादव युवा मंच, अष्टविनायक मित्र मंडळ, युवा सहकारी, ज्येष्ठ शिवसैनिक यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group