आळंदी (Pclive7.com):- माऊली मंदिरात काल श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर मनमोहक अशी श्री प्रभू नृसिंह अवताराची चंदनउटी साकारण्यात आली होती. ती पाहण्यासाठी व मुख दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. भाविकांसाठी श्रींच्या चल पादुकांचे दर्शन दुपारी अडीच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कारंजा मंडपात ठेवण्यात आले होते. श्री नृसिंह जन्माचे कीर्तन व श्री नृसिंह जन्म उत्सव वीणा मंडपात करण्यात आले. त्यानंतर भाविकांना सुंठवडा प्रसाद ही वाटण्यात आला.
यावेळेस पंजाब मधील खडूर साहिब विधान सभेचे आमदार रमनजीत सिंह सिक्की यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास सदिच्छा भेट दिली. जीवन बदलवणारा हा अनुभव आहे. माऊलींच्या या दर्शनाने मनाला समाधान व आनंद लाभला अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त अभयजी टिळक यांच्या हस्ते श्रीफळ, शाल व ज्ञानेश्वरी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसाद बोराटे, नंदकुमार वडगांवकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसन्न बोराटे, बाळू नेटके, कैलासराव चिखले, कपिलशेठ थोरात, योगेश आरु, योगिराज कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान मंदिरास ५० हजार रुपये अन्नदानासाठी त्यांनी देणगी दिली.