पिंपरी (Pclive7.com):- आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार चौरस फुटाच्या अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफ झाला. 100 टक्के शास्तीमाफीसाठी प्रयत्नशिल आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून ते मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. मावळच्या जागेबाबत केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे मी आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच लढविणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरीच्या महिला संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, निलेश हाके, बशीर सुतार, देहूगावचे शहरप्रमुख सुनील हगवणे आदी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राज्यात सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. मावळ लोकसभा मतदारसंघातील बहुतांश पदाधिकारी सक्रियपणे शिंदे साहेबांसोबत असल्याचे सांगत खासदार बारणे म्हणाले, 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून मी निवडून आलो. शिवसैनिकांसोबत भाजपच्याही कार्यकर्त्यांनी माझे काम केले. त्यांच्यामुळेच मी 8 वर्षे देशाच्या लोकसभेत मावळवासीयांचे प्रतिनिधीत्व करत आहे. केंद्र, राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना जिल्ह्यांचे दौरे करायला सांगितले होते. मी तीन जिल्ह्यांचा दौरा केला. राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत आहे. पालकमंत्री शिवसैनिकांचे काम करत नाहीत. खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा तीव्र भावना शिवसैनिकांच्या होत्या. पक्षाचे नुकसान होत असल्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही पक्षप्रमुखांकडे दिला होता. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाही सर्वजण एकत्र राहू, शिवसेना-भाजप युती राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली होती. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेतल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहोत. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बांधणीसाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविली जाईल. महापालिका निवडणूक भाजपसोबत लढविणार आहोत. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करुन निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री शिंदे शहरात येतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. आजपर्यंत पालिकेतील चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही. पाठिशी घातले नाही. आताही चुकीची कामे रोखली जातील, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोग, न्यायालयात आहे. येत्या काही दिवसात पक्ष चिन्हाचा वाद मिटेल. चिन्हही मिळेल. 2024 अद्याप लांब आहे. चिन्हाबाबत अधिक बोलणार नाही मात्र मी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.