पिंपरी (Pclive7.com):- पेट्रोलपंपावरील १२ लाख रकमेचा भरणा करण्यासाठी गेलेल्या एकाला पिस्तुलाचा धाकाने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नागरिकांच्या मदतीने त्याला पकडले. आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील तुळजाभवानी मंदिराजवळ सोमवारी (दि.२६) हा प्रकार घडला. ‘वर्दी’तील या ‘दुर्गा’च्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील तुळजाभवानी मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी सरस्वती काळे या सोमवारी दुपारी तुळजाभवानी मंदिराजवळ बंदोबस्तावर होत्या. त्यावेळी आकुर्डी येथील एका पेट्रोलपंपाची १२ लाख रुपयांची रक्कम महाराष्ट्र बँकेच्या खंडोबा माळ चौकाजवळील शाखेत भरणा करण्यासाठी पेट्रोलपंपाचे कर्मचारी आले होते. यातील एक कर्मचारी बँकेच्या पायऱ्या चढून जात असताना एका चोरट्याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
चोरट्याच्या हातात पिस्तूल पाहून तेथील इतरांची धावाधाव सुरू होऊन गोंधळ उडाला. हा प्रकार बंदोबस्तावरील सरस्वती काळे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लागलीच बँकेजवळ धाव घेतली. त्यावेळी पेट्रोलपंपाचा कर्मचारी आणि चोरटा यांच्यात झटापट सुरू होती. सरस्वती काळे यांनी नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडले.
सदर घटनेची निगडी पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून त्याचेकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रमोद नामदेव चांदने असे सांगितले. तसेच त्याचेसोबत आणखी त्याचे दोन साथीदार १. जयदीप मधूकर चव्हाण व २. संतोष अभिमान चोथवे दोघेही राहणार मोरे वस्ती, हे सर्वजण आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी दरोड्याच्या उद्देशाने घातक हत्यारासह आले असल्याची कबूली दिली. त्यांचेविरुद्ध निगडी पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३९३, आर्म अॅक्ट ३ (२५) सह म.पो. का. कलम १३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस आयुक्तांकडून ‘शाबासकी’
चार जिवंत काडतुसे असलेले पिस्तूल चोरट्याच्या हातात होते. तरीही न घाबरता महिला पोलीस कर्मचारी सरस्वती काळे यांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने चोरट्याच्या हातातील पिस्तूल काढून घेऊन त्याला पकडले. या धाडसाचे शहर पोलीस दलातून कौतुक होत आहे, तसेच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या धाडसाबद्दल सरस्वती काळे यांना दहा हजारांचा रिवॉर्ड जाहीर केला आहे. तसेच मंगळवारी निगडी पोलीस ठाण्यात सरस्वती काळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
Tags: आकुर्डीखाकीतील दुर्गाटोळीला पिस्तुलासह केले जेरबंददरोडाधाडसी कामगिरीनिगडी पोलिसमहिला पोलीस अंमलदारसरस्वती काळे






















Join Our Whatsapp Group